श्री. श्रीकांत माळी

 

६७ वर्षे

श्री. श्रीकांत माळी (वय ६७ वर्षे),  यांनी पायी नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. त्यांच्या रोमांचक प्रवासाचा एक स्व-व्यक्त वर्णन येथे आहे...

 

रुजवात:

चार वर्षांपूर्वी ‘नर्मदा परिक्रमा’ यात्रा आयोजकांतर्फे सपत्नीक केली होती. त्यावेळी गरुडेश्वरला एक पायी परिक्रमावासी (नाशिकचे श्री. कुलकर्णी) भेटले होते. त्यांच्याशी झालेल्या संवादातून पायी परिक्रमेविषयी थोडीफार माहिती मिळाली. त्यांची ती दुसरी परिक्रमा होती. त्यामुळे आपणही अशी पायी परिक्रमा एकदा तरी करावी असा विचार डोक्यात रुजला. प्रत्यक्षात २०२२ च्या नोव्हेम्बर महिन्यात त्याला मूर्त स्वरूप आले.

मागील वर्षी म्हणजे २०२२ साली पायी नर्मदा परिक्रमा करणार्‍यांसाठी पुण्याच्या तिघांनी ‘नर्मदा पायी परिक्रमा २०२२-२३’ ह्या नावाने व्हॉट्सअॲपवर एक समूह स्थापन केला. त्यांची नावे अशी-

१)    डॉ. श्री. मिलिंद शिरगोपीकर (९४२२९८७६५६)

२)    सौ. वृषाली हळबे (७५८८२८४६२६)

३)    श्री. धनंजय नाईक (९९२२४४३८७८)

परिक्रमेचा रीतसर कालावधी संपल्यावर हा समूह बंद करण्याविषयी निवेदन श्री. धनंजय नाईक यांनी समूहावर टाकले. परंतु हा समूह एवढा लोकप्रिय झाला की तो बंद करू नये जनमत पडले. भावी परिक्रमावासीयांसाठी तो मार्गदर्शक ठरू शकतो असे अनेकांनी प्रतिपादन केले. समूह प्रशासकांनीही मोठ्या मनाने विनंतीचा मान राखत समूह बंद केला नाही. सदर समूहाचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी उपरोल्लेखीत त्रयीपैकी कोणाशीही संपर्क साधावा. पायी नर्मदा परिक्रमा करू इच्छिणार्‍यांना परस्परसंवादातून, परिक्रमा पूर्ण  केलेल्या लोकांच्या अनुभवातून बोध घेता यईल. हा एक स्तुत्य, उपयुक्त सामाजिक उपक्रम आहे.

नर्मदा पायी परिक्रमा २०२२-२३.

तयारी:

दि. २० नोव्हेम्बर २०२२ ला ओंकारेश्वर येथील श्री. गजानन महाराज आश्रमात पोहोचलो. आधारपत्र दाखवून मठात परिक्रमेसाठी पंजीकरण केले. खांद्यावरून पाठीवर घेण्याची पिशवी, श्वेत वस्त्रप्रावरणे, कमंडलू (पाण्याची बाटली), झोपण्यासाठी उष्णतारोधक पॉलीयुरेथेन फोमची वजनाला हलकी गुंडाळी तसेच इतर आवश्‍यक वस्तू घेतल्या होत्याच. एक दंड विकत घेतला, मैय्याची प्रतिमा घेतली. भ्रमणध्वनीवर असणारे माहितीपुस्तिकावजा तक्ते, ज्यामध्ये परिक्रमेदरम्यान लागणारी गावे, अंतर, आश्रमांची नावे, स्थानमाहात्म्य, रस्ता (सडक, पाऊलवाट, जंगलमार्ग) आदी तपशील होता, त्याच्या प्रती काढून घेतल्या. क्षौर केले. दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. २१ नोव्हेम्बरला नर्मदास्नान आटोपून, ओंकारेश्वर तसेच ममलेश्वर दर्शन घेऊन मैय्येच्या तीरावर गुरुजींच्या निर्देशानुसार एका लहान बाटलीत नर्मदेचे जल भरून घेतले. हे नर्मदाजल, दंड व मैय्याच्या प्रतिमेची पूजाअर्चा केली. नर्मदा आरती केली, नर्मदाष्टक पठण करून पायी नर्मदा परिक्रमेचा संकल्प सोडला आणि किनारामार्गे परिक्रमेला सुरुवात केली.

परिक्रमेचा आरंभ:

परिक्रमा म्हणजे मंदिरात घातली जाते तशीच, मैय्याला उजवीकडे ठेवून घातलेली प्रदक्षिणा. ही सहसा नर्मदेचे उगमस्थान असलेले अमरकंटक किंवा ओंकारेश्वर येथून सुरू करून त्या त्या ठिकाणी पुन्हा येत पूर्ण करायची असते. अंतर ३००० ते ३२०० किमी. संकल्प सोडतांना आम्ही तिघेजण होतो. एकजण सडकमार्गाने निघाला. आम्ही दोघे किनारामार्गे निघालो. किनारामार्ग बर्‍याचदा  निर्जन असला तरी साथीला खंड्या, सुतारपक्षी, टिटव्या, विविध बगळे व इतर वेगवेगळे पक्षी, त्यांचे कूजन, झाडंझुडुपं होती, त्यामुळे नितांतरमणीय निसर्गसमृद्धी अनुभवायला मिळाली. मैय्याच्या किनार्‍याचा रस्ता म्हणजे चढउताराची, काही ठिकाणी अरुंद पायसगर. कुठे खडकातून, कुठे नाल्यातून, कुठे हिरव्यागार शेतातून, कुठे पर्वतराजीतून, कुठे चिखलातून, कुठे वाळुतून, कुठे दगडगोट्यातून, वेगवेगळ्या रुपातील पाऊलवाट. परिक्रमा करतांना कोठेही नर्मदा ओलांडायची नाही हा परिक्रमेचा नियम आहे. भल्या पहाटे उठून प्रातर्विधी आटोपून दंड, बरोबर बाटलीत भरून घेतलेले नर्मदाजल व नर्मदा प्रतिमा यांचे पूजन करून नर्मदेची आरती व नर्मदाष्टक पठण करून सूर्योदयाच्या वेळी चालायला सुरुवात करायची. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आश्रमात जेवणासाठी थांबायचे पुन्हा चालायला प्रारंभ करून सूर्यास्ताचा अंदाज घेऊन आश्रमात संध्याकाळचा पूजापाठ, भोजन व मुक्कामासाठी थांबायचे असा दिनक्रम असायचा. सरदार सरोवरामुळे किनार्‍याचा रस्ता काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याखाली आला आहे. पर्यायी, सडकमार्गाचा अवलंब करावा लागतो.

                                         

 

आश्रम व्यवस्था:

परिक्रमावासीयांची परिक्रमा बिनघोर व्हावी व त्यांच्या भोजन तथा निवासाची सोय पाहणारी ही व्यवस्था म्हणजे परिक्रमेचा कणा आहे. अनेक प्रसिद्धीपराग़्ड़मुख व्यक्तींच्या दातृत्वाचे दृश्यस्वरूप म्हणजे परिक्रमा मार्गावरील गावांमध्ये असलेले आश्रम. ह्या आश्रमांमध्ये चहा, बालभोग (न्याहरी), भोजनप्रासादी (जेवण) व रहिवासाची सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिली जाते. अशा आश्रमाना अन्नक्षेत्र म्हणतात. उपवास असणारांसाठी उपवासाचे पदार्थ दिले जातात. फार थोड्या आश्रमांमध्ये स्वयंपाकी नसतात पण सर्व प्रकारचा शिधा उपलब्ध करून दिला जातो. जेवण बनवून घ्यावे लागते. अशा आश्रमांना सदावर्त म्हणतात. काही मंदिरं आश्रमाची सर्व सुविधा देतात. काही गावात आश्रमच नसतात. अशा ठिकाणी मोठे मंदिर हे असतेच आणि मंदिराच्या जवळपास हापशाची (हातउपसा-हॅण्डपंप) सुविधा असतेच असते. क्वचित विहीर असते. हापशाचे पाणी थंडीतही काहीसे ऊबदार असते. जेवणासाठी एकतर गावातील कुणीतरी आणून देतो किंवा गावातील कुणाकडेतरी सोय करून दिली जाते. परिक्रमेत असतांना दिवसभर चालल्यामुळे भूक चांगली लागायची त्यामुळे जेवण तीन पटींनी वाढले होते ह्याची सुरुवातीला लाज वाटून अवघडल्यासारखे वाटायचे पण नंतर सरावलो. आश्रमवालेही पुरून उरायचे. एकूण परिक्रमावासीयांची गैरसोय होऊ न देण्याकडे कल असतो. आश्रमाचे व्यवस्थापन पाहणारी व्यक्ती ही सहसा ज्येष्ठ व अनुभवी असते व तिची पायी परिक्रमा बहुतेक झालेली असते.

                               

 

 

 

परिक्रमेचे नियम:

१)    परिक्रमेस प्रारंभ करण्यापूर्वी मुंडण करणे. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत केस व दाढी वाढू द्यायचे. पांढरी वस्त्रे परिधान करायची.

२)    परिक्रमा सुरू करण्याच्या दिवशी नर्मदेतटी नर्मदाजल एका बाटलीत भरून घ्यायचे. दंड, कमंडलू नर्मदा, नर्मदाप्रतिमा यांचे गुरुजींच्या निर्देशानुसार पूजन करायचे व संकल्प सोडायचा.

३)    सूर्योदय व सूर्यास्त ह्या दरम्यानच चालायचे.

४)    रस्त्यात कोठेही नर्मदा ओलांडायची नाही.

५)    परिक्रमेदरम्यान जसे जमेल तसे कन्यापूजन करायचे. यथाशक्ती दक्षिणा द्यायची. जमेल तिथे कढाई करायची. नर्मदेला नैवेद्य दाखवायचा.

६)    कोणत्याही प्रकारे नर्मदा दूषित करायची नाही.

७)    रोज दोन्हीवेळा दंड (हा बांबूचाच असणे आवश्यक), नर्मदाजल व नर्मदाप्रतिमा यांची पूजा करायची, नर्मदा आरती करायची नर्मदाष्टक पठण करायचे.

मार्गक्रमणातील अनामिक मैय्यादूत:

परिक्रमेदरम्यान कुणाशीही बोलायची सुरुवातनर्मदे हरअसे मैय्याचे नाव घेत व्हायची. मुलं, तरूण किंवा वयस्कर, स्त्रिया असोत की पुरूष, सर्वांच्या वागण्याबोलण्यात नम्रपणा, श्रद्धाभाव, आदरभाव असे. पूर्ण परिक्रमेत कोठेही वादावादी, तंटे आढळले नाहीत. श्रीमंत असोत की सर्वसाधारण कोणाच्याही अंगात आढ्यताखोरी, उर्मटपणा, अहंगंड, दिखाऊपणा दिसला नाही. राहण्या-वागण्या बोलण्यात कमालीचा साधेपणा जाणवला. शूलपाणेश्वर जंगलात सकाळी भर थंडीत एका डोंगरावर एक आदिवासी महिला एका तांब्यातून चहाचे वाटप करीत होती. जवळपास घर दिसले नाही म्हणून सहज विचारले माताजी, कहां रहती हो?’ त्यावर तिने समोरच्या डोंगरावरील एका झोपडीकडे बोट दाखविले. म्हणजे एक डोंगर उतरून दुसरा डोंगर चढून सेवाभावाने कोऱ्या चहाचे वाटप करीत होती. स्वत: कडाक्याच्या थंडीत राहून श्रद्धेने सेवा देत होती.

  

 

जबलपूरजवळ महामार्गालगत एका दुकानाबाहेर सातआठ तरूणांचा एक घोळका होता. माझ्याकडे लक्ष जाताच एकाने आवाज दिला. ‘महाराज, चाय पी लो.’ लागलीच एकजण दुचाकीवर चहा आणायला गेला. मधल्या वेळात बहुतेकांनी औत्सुक्य आणि कुतुहलाने परिक्रमेविषयी अनेक प्रश्न विचारले. शेवटी एक एक करून सर्वांनी वाकून नमस्कार केला. प्रत्येकाने दहा रुपये, वीस रुपये अशी दक्षिणा दिली.

एका आश्रमात पोहोचल्यावर आसन लावतांना दंड विसरल्याचे लक्षात येताच मैय्या व आसन तिथेच ठेवून निघालो. आश्रमवाल्यांनी विचारले, ‘क्या हुआ? कहां जा रहे हो?’ असे विचारले. त्यांना कारण सांगताच ते म्हणाले, ‘दंड कहां रखा है बताओ, हमारा आदमी मोटरसाइकिलपर जाकर ले आएगा.’ ‘गलती मेरी है तो और किसीको तकलीफ क्यों?’ असे म्हटल्यावरही त्यांनी आग्रह केला. कसेबसे त्यांना समजावून मी निघालो. गावातून जातांना गावकर्‍यांनी कारण जाणून घेऊन वरीलप्रमाणे तयारी दर्शविली. त्यांनाही नम्रपणे नकार देऊन मी दंड आणला.

महामार्गावरून जातांना संध्याकाळ होत आली होती म्हणून समोर दिसलेल्या एका गुराख्याकडे आश्रमाविषयी चौकशी केली. ‘आश्रम यहांसे छह किमी है अंधेरा हो जाएगा. आप आज मेरे घर रुक जाओ. वो सामने गांव है वहा मंदिर है उसके बाजूमें मेरा घर है. आप निकलो मै आता हूं.’ मी त्याला नाव विचारता तो म्हटला, ‘ढाबेवालेका घर पूछो.’ त्याचे घर प्रशस्त होते. अंगण, अंगणात एका बाजूला स्वतंत्र बांधलेले मंदिर वजा देवघर, पडवी व पाचसहा खोल्या, गोठा. घराशेजारी मोठे शेत, त्यालगत मोठा ढाबा, भरपूर मोकळी जागा असे त्याचे घर. कोठेही मोठेपणा नाही. वागण्याबोलण्यात नम्रपणा, अनेक कुटुंबांबरोबर राहण्याचा योग आला. हे साधेपण सर्वत्र विशेषत्वाने जाणवले. दुसऱ्या दिवशी निघतांना त्याने दोन ओंजळी भरून भाजलेले सोले बांधून दिले.

हरदा गावात संध्याकाळी पोहोचलो.  तेव्हा एका हातगाडीवरील चहावाल्याने बोलावून चहा दिला आणि विचारले, ‘बाबाजी, आपको क्या खानेका मन कर रहा है वो मैं आश्रममे लेकर आऊंगा.’ आश्रमाचे नावही विचारून घेतले. त्याप्रमाणे रात्री मी सांगितल्याप्रमाणे खिचडी घेऊन आला. जेवण झाल्यावर चहा घेऊन येतो मी नको म्हणताचतो फिर पान लेकर आता हूंअसे म्हणाला. त्याचा आग्रह पाहून त्याला साधे पान आणायला सांगितले. पान आणल्यानंतर सकाळी केव्हा निघणार हे विचारून सकाळी चहा घेऊन येईन म्हटल्यावरअभी आपने इतना सब किया है मेरे लिए तो इतनी सुबह चाय बनाकर लानेका कष्ट मत उठाओअसे त्याला निक्षून सांगितले. त्यावरठीक हैअसे म्हणून तो गेला. सकाळी सहाच्या सुमारास आश्रमातून बाहेर पडतांना एक गृहस्थ मोटरसायकलवरून आले हातात कप व चहाची पिशवी घेऊन.  मला पाहून थांबून चहा दिला. ‘कल भोजन प्रासादी देनेवाला आपका बेटाही था नं? मैने तकलीफ उठानेको मना किया था.’ त्यावर तो हसला. बरोबर आणलेला चार कप चहा आग्रहाने प्यायला लावला, आणि हावरटपणा ऐन भरात असल्याने मीही तो प्यालो. ‘नर्मदे हरची साद दिली आणि प्रतिसाद पावून निघालो.

एका गावात रस्त्याकडेला हातगाडीवर पाणीपुरीविक्रेत्याला आश्रमाविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘बाजूमे हनुमानजीका मंदिर है वहां रुको. मंदिर के बाजू मे कुटिया है वहां एक बाबाजी से भोजन मांग लो.’ मंदिरात तीनचार परिक्रमावासी म्हटले आमचे जेवण झाले. बाबाजी देतात त्यांना विचारा.  त्याप्रमाणे बाबाजींना विचारता ते म्हणाले, ‘अभी सबका खाना हो गया कुछ भी बचा नहीं.’ नंतर मंदिरात थांबलो. थोड्या वेळाने पाणीपुरीवाला आला. ‘महाराज भोजनप्रसादी मिली?’ मी नाही म्हणताच तो म्हणाला, ‘देखता हूं’. थोड्या वेळाने एक मुलगी  एका ताटलीत चार पोळ्या आणि लिंबाच्या लोणच्याच्या चारपाच फोडी घेऊन आली. पाठोपाठ तिचे वडील (पाणीपुरीवाला) आले. ‘सबजी खतम हो गई तो अचार ही दिया हैअसे खेदाने म्हणाला. ‘महाराज, आपने इतना सब पेटभर दिया यही बहुत है.’ ‘थाली यहीपर बाजूमे रख दोअसे म्हणून तो गेला. मी थाळी धुतली चार बिस्किटाचे पुडे ठेवले, (रस्त्यात लोकांनीच दिलेले) आणि त्याच्या ठेल्यावर जाऊन त्याला दिले आणि म्हटलेये आपकी बेटी के लिए.’

अशी ही अलौकिक माणसं. दातृत्वाच्या ध्यासाने प्रेरित. त्यांच्याकडे काय आहे किती आहे याचा ते विचार न करता फक्त निरपेक्षपणे देत राहतात. आणि हे हजारो वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. पुढील पिढ्यांवर संस्कार अनायास होत आहेत,  भावना एकच, मैय्या देती है. कोणाचे आभार मानले तर लगेच मैय्या देती है असे त्यांचे उत्तर असते. सर्वत्र सात्त्विक भावाचा प्रभाव. सरदार सरोवर प्रकल्पामुळे काही गावं नव्याने वसवली गेली आहेत. जुनी गावं पाण्याखाली गेली आहेत. स्थित्यंतराचा त्रास सोसूनही कुठेही तक्रारीचा सूर नाही. सर्वदूर चिरंतन सात्त्विक समाधान.

सहप्रवासी सुह्रुद:

माझ्याबरोबर मध्यप्रदेशी चार माणसांचा समूह सर्वात जास्त काळ म्हणजे चार ते पाच आठवडे आम्ही बरोबर होतो. ह्या सर्वांची मला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मदत झाली, शिकायला मिळाले. बुटात काहीतरी मधून मधून टोचत होते म्हणून काय टोचतंय ते एका आश्रमात शोधत असता एकानेलाओ इधर मै देखता हूंअसे म्हणून बूटातला लहान खिळा नेमकेपणे काढून दिला. माझ्याकडील पथारीची गुंडाळी एका ठिकाणी विसरल्याचे समजताच दुसर्‍या एकाने त्याच्याकडील जास्तीची पथारी मला देऊन टाकली. माझा चलभाष घामाने भिजल्याने बंद पडला असता एका आश्रमाच्या कौलांवर वाळायला ठेवून दिला. काही वेळाने त्याची बाजू पलटून दुसरी बाजूही वाळवली. नंतर पूर्ण चार्ज करून सुरु करण्याचा सल्ला दिला. तसे केल्यावर चलभाष व्यवस्थित सुरू झाला.

 


माझी पथारीची गुंडाळी पाठीवरच्या पिशवीला दोरीने बांधूनही ती खाली सरकायची आणि चालतांना व्यत्यय आणायची. ते पाहून एका आश्रमात उरलेल्या दोघांनी माझ्याकडील मोठी दोरी मागून घेतली. ती दुहेरी केली आणि जितकी लांबी आवश्यक होती तेवढ्या अंतरावर दोघही उभे राहिले. एकाने दोरी धरून ठेवली आणि दुसरा पीळ देऊ लागला. नंतर वळकटी पिशवीला कशी बांधायची याचे मला प्रात्यक्षिक दाखवले. पुढील प्रवासात  वळकटी बांधणे सोपे होऊन गेले. अशा अनेक गोष्टी सहपरिक्रमावासीयांकडून शिकलो.

 

पाठीवर वाहायच्या सामानाच्या पिशवीचा एक बंद अर्धा उसवला होता. बरोबरच्या परिक्रमावासीयाने ही बाब माझ्या नजरेस आणून दिली आणि म्हटला, माझ्याकडे सुईदोरा आहे, आश्रमात गेल्यावर पाहू. नंतर आश्रमात पोहोचल्यावर आसन लावल्यानंतर त्याने आठवणीने सुईदोरा काढला आणि बंद शिवून दिला. फार गरजेचे काम होते हे कारण रस्त्यात कुठेतरी तुटला असता तर चांगलीच पंचाईत झाली असती. असे हे एकरूप झालेले सहपरिक्रमावासी सुह्रुद. ह्या सर्व प्रसंगात एक साम्य आहे. सर्वांनी मी न मागता मला मदत केली. मला असलेला त्रास किंवा मला होऊ शकणारा त्रास ह्याचे निरीक्षण करून किंवा कयास बांधून  मला मदतीचा हात देऊ केला. त्यांनी प्रसंगावधान राखून केलेली कार्यवाही व माझे जडत्व ह्या फरकाच्या जाणीवेमुळे माझी कनिष्ठत्वाची भावना अधिकच ठळक झाली. कुणीतरी मदत मागेपर्यंत थांबायचे नसते, तर दुसर्‍यांच्या अडचणी पाहून द्रष्टेपणाने केलेली मदत ही खरी मदत.

विशेषत्वाने नमूद करण्यासारखे प्रसंग:

शूलपाणेश्वर जंगलात घोंगसा यथील लखनगिरी आश्रमात जातांना होडीने जावे लागते. आम्ही सर्व होडीत बसल्यावर एक कुत्रा टुणकन उडी मारून होडीत आला. नावाड्याने त्याला बाहेर काढले आणि वल्हवायला सुरुवात केली. ते पाहून कुत्र्याने नदीत उडी मारली आणि तो आमच्या पुढे पोहत निघाला. अंतर बर्‍यापैकी होते कुत्र्याच्या मानाने खूपच होते. समोरून परतणारा दुसरा होडीवाला येत होता. कुत्रा मोठा होता पाण्यात भिजलेला होता एकतर वजन त्यातही भिजलेला त्यामुळे हातातून सटकत होता. त्यातच नावाडी व कुत्रा एकाच बाजूला आल्यामुळे होडीही बरीच कलली होती तरीही नावाड्याने जोखीम पत्करून कुत्र्याला कसेबसे होडीत घेतले आणि आश्रमाच्या दिशेने आमच्याबरोबर निघाला. आमच्याबरोबर  कुत्र्याला सोडले आणि दोघेही नावाडी आपापल्या होड्या घेऊन परतले. हा कुत्रा नंतर संपूर्ण शूलपाणेश्वर जंगलरस्ताभर आणि जंगल संपल्यावरही पाच सहा दिवस आमच्याबरोबर होता. दुसर्‍या नावाड्याची भूतदया चकित करणारी होती. अशी ही अलौकिक माणसं. खरोखर पुण्यवान. अशी परोपकाराची कामे करायला प्रेरणा व बुद्धी देणारी मैय्याच. मैय्याने निवडलेली व तिचा वरदहस्त लाभलेली. आम्हाला त्यांचा अल्पकाळ का होईना पण सहवास लाभला हे आमचे भाग्य.

 

मध्यप्रदेशातील सोहागपुरहून पुढे जातांना एका चहावाल्याने हाक दिली. नर्मदे हर. ‘बाबाजी, चाय पी लो.’ चहा पीत असतांना महाराज, परिकम्मा के गावों के नाम सुनलोअसे म्हणून सर्व गावांची नावे पाऊण मिनिटात ऐंकवली. संपूर्ण यादी मुखोद्गत आणि वेग हे त्याचे वैशिष्ट्य.

                               

खलघाटला मैय्याचे दर्शन घ्यायला तटावर गेलो तेव्हा संध्याकाळ होती. तिथे दहा बारा वर्ष वयाच्या तीन मुली आल्या. एकीच्या कडेवर एक छोटी मुलगी होती. चौघी ओळीने मैय्याच्या काठाशी बसल्या, हात जोडले, कुठलेतरी स्तोत्रम्हटले. शेवटी नर्मदेची आरती म्हटली. तिघीही ओंजळभर मैय्याचं पाणी प्याल्या. लहानगीलाही थोडे पाणी पाजले आणि निघून गेल्या. श्रद्धा, संस्कार आणि शिस्त यांच्या त्रिवेणीसंगमाचे दर्शन झाले.

तेलियाभट्याण येथील सियारामबाबा आश्रमात असलेल्या हनुमान मंदिरात हनुमंतरायांचे दर्शन घेतले, तिथे पारायण करीत असलेल्या सियारामबाबांच्या पाया पडलो. आश्रमात जास्त लोकांना सुविधा देता याव्या ह्यासाठी पुनर्बांधणी सुरू होती. बाबांचे वय १०७ वर्षं, अत्यंत जर्जर काया पण अजूनही नित्यकर्मं स्वतःच करण्याकडे कल असतो. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीयाला आश्रमातर्फे आगपेटी, उदबत्ती पुडा व तुपात भिजविलेल्या वातींचे वाटप केले जात होते.

 

 

एका आश्रमातील महंत आलेल्या १७-१८ परिक्रमावासीयांसाठी चहा घेऊन आले. सर्वांना चहावाटप करून गेले व पुन्हा चहा घेऊन आले व त्यांनी विचारले, ‘छोटा ग्लासवाले बाबा किधर है?’ माझ्याकडे लक्ष जाताच म्हणाले, ‘बाबाजी, आपका ग्लास बहुत छोटा है, और चाय पा लो.’ सर्वांना सर्व काही पुरेसं मिळायला हवं ह्याविषयीचा कटाक्ष आणि कळकळ ह्या छोट्या प्रसंगातून दिसून आली.

मार्गात दोन ठिकाणी दंडवत परिक्रमा करणारे दिसले. दंडवत परिक्रमा म्हणजे संपूर्ण परिक्रमा दंडवत घालत करावयाची. ह्या प्रकारच्या परिक्रमेला सात ते आठ वर्षांचा कालावधी लागतो. एका आश्रमाच्या महंतांना दंडवत बाबा या नावाने संबोधले जात होते. त्यांनी दोन वेळा दंडवत परिक्रमा केली होती.

 

अनुभूती:

परिक्रमा मार्ग केव्हा, कुठे आणि कसे वळण घेईल ह्याची शाश्वती नसायची म्हणून परिक्रमामार्गात कुठे कुठे दिशादर्शक बाणाची खूण असायची. बर्‍याच ठिकाणी झाडाच्या फांदीवर किंवा शेताच्या कुंपणावर, वळणाच्या ठिकाणी छोटे झेंडे किंवा लाल केशरी पताका किंवा वस्त्र लटकवलेले असायचे. नजरेच्या टप्प्यात बरोबर दिसेल अशा पद्धतीने बांधलेले असायचे  त्यावरून रस्त्याचा बोध व्हायचा. तरीही रस्ता चुकल्यास नर्मदे हरअशी हाळी द्यायची. ही हाक ऐकणाऱ्याला बरोबर समजायचे, कुणालातरी काहीतरी मदत हवी आहे. ऐकणारी व्यक्ती प्रतिसाद द्यायची, ‘नर्मदे हरʼ आणि मग संवाद सुरू व्हायचा आणि समस्या निवारणही व्हायचे, पण सुरुवात परवलीचा शब्द असल्याप्रमाणे नर्मदे हरनेच. मार्गात कुणी नर्मदे हर म्हटल्यास नमस्ते, अथवा रामराम सारखा नर्मदे हर असा प्रतिसाद द्यायचा. आश्रमात दर्शनी भागात कुणी नसल्यास नर्मदे हर अशी हाळी दिली की आतून आओ महाराज, आसन लगाओ.’ असा प्रतिसाद यायचाच. आश्रम सोडतांना निरोप घेण्यासाठी नर्मदे हर, धन्यवाद देण्यासाठी नर्मदे हर म्हणायचे. रस्त्यात चालून भूक कायम असायचीच. मग मार्गात कुणीतरी फळं, कुणी बिस्किटपुडे, गूळ शेंगदाणे,गूळ फुटाणे, शेव मुरमुरे, तयार खाद्यवस्तुंची पाकिटे देत असत. कुणी रोख रक्कम द्यायचा. चहा रोज पाच सहा कप मिळायचा. रस्त्याच्या कडेला हातगाडीवर चहा नाश्त्याच्या दुकानावर क्वचित बालभोगही (नाश्ता) आग्रहाने देत असत. दुकान लहान असो वा मोठे, देण्याच्या वृत्तीत कमतरता नसायची. काही वेळा वाटेत एखादा गाडीवाला गाडी थांबवून खाद्य वस्तु देऊन वाकून नमस्कार करायचा. कुणी गाडीत बसा पुढच्या गावात सोडतो म्हणायचा, अनेक मोटरसायकलवाले गाडी थांबवूनबैठो महाराज, अगले गांवमे छोडता हूं’. अशी तयारी दाखवायचे. या सर्वांना निग्रहपूर्वक पायीच जाण्याच्या संकल्पाविषयी समजावणे कठीण जायचे. या सर्वांना अंत:प्रेरणा देणारी मैय्याच. ‘मैय्या किसीको भूखा नही रखतीही दृढभावना परिक्रमावासीयांमध्ये आहे आणि माझाही अनुभव वेगळा नव्हता.

                   

आपापल्या परीने, परंतु अतिशय श्रद्धेने, मोठ्या मनाने देणारे दाते भेटले. कोणाला धन्यवाद म्हटले तर ते म्हणायचे, ‘धन्यवाद मैय्याका करो वो देती है.’ मैय्याच्या भोवतालचा प्रदेश सकारात्मक उर्जेने भरलेला, भारलेला वाटत होता.  मैय्येचे अस्तित्व जाणवत राहायचे.

परिक्रमेविषयी काही समज:

१)    परिक्रमामार्गात अश्वत्थामा दिसतो.

२)    परिक्रमेत मैय्या कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतेच.

३)    मैय्या परिक्रमा पूर्ण करवून घेते.

ह्या समजांच्या जवळपास जाणारे अनुभव आले.

१)    एका गावातून जात असतांना दोन जणांनी सांगितले, ‘बाबाजी, आप सामनेवाली गलीसे जाओगे तो आपको परिकम्मावासी दिखेंगे, वहां बालभोग पा लो.’ असे आग्रहपूर्वक सांगितले. परिक्रमावासी दिसले नाहीत पण एका घराच्या बाहेर पाच सहा पादत्राणे दिसली म्हणून बाहेरूनच नर्मदे हर चा उच्चरवात पुकारा केला. त्याबरोबर आओ महाराज, बालभोग पा लो.’ असा प्रतिसाद आला. आत सहा जण शिरा खाऊन निघण्याच्या बेतात होते. मलाही गरम गरम शिरा आग्रहाने दोन वेळा वाढत खाऊ घातला. अगदी पोटभर. तोपर्यंत आधीच्या समूहाने पुढे कूच केले होते. माझे पाणी पिणे आटोपून निरोपाचे, धन्यवादात्मक नर्मदे हर करून निघालो, तसे तेथील यजमानांपैकी एक ज्येष्ठ गृहस्थ माझ्याबरोबर आला आणि म्हटला आगे रास्तेमे ही हमारा खेत है, वहां तक आपके साथ आता हूं.’ असे म्हणून थोडा वेळ माझ्याबरोबर चालून मला म्हणाला, ‘महाराज, आप आगे चलो, मै आता हूं’. गाव मागे राहिल्यामुळे रस्ता सुनसान होता. काही मिनिटात तो पुन्हा आला. आता अचानक तो रडायला लागला. ‘महाराज, मेरी आदत छुडानेके लिए मै क्या करू?’ एव्हाना तो पिऊन आल्याचे माझ्या लक्षात आले होते. ‘रोज पिते हो?’ तो म्हणाला, ‘रोज पांचसो रुपये की पिता हूं.’ धीरे धीरे कम करो वगैरे एकदोन वाक्यं मी बोललो पण त्याकडे साफ दुर्लक्ष करीत तो सांगू लागला, ‘महाराज, मैने दो खून किए है. मेरे बेटे का भी खून हो गया.’ एवढे बोलून तो पुन्हा रडायला लागला. ‘आपका एकही लडका था क्या?’ मी विचारले. ‘एक बेटी भी है, उसकी शादी हुई है’. एव्हाना त्याचे शेत आले. त्याने शेत कुठपर्यंत पसरले आहे ते दाखवले. मोठेच्या मोठे लांबवर पसरलेले गहू व मटार लावलेले हिरवेगार शेत होते. सात आठ पोत्यांमध्ये भरलेली मटार मंडईची वाट पाहत होती. त्याने एक पोते उघडले मला म्हणाला, ‘महाराज, मटर ले जाओ. माझ्या पाठीवरची झोळी उघडून त्यात जवळपास किलोभर मटार कोंबली. निघतांना आभार मानून त्याचे हात हातात घेऊन म्हणालो,

महाराज, खुदको संभालो.’

 

२)    दुपारच्यावेळी एका आश्रमात प्रवेश करत असतांना शेजारच्या घराबाहेर उभ्या असलेल्या माताजींनी नर्मदे हर केले मीही नर्मदे हर असा प्रतिसाद दिल्यावर त्यांनी विचारले, ‘महाराज, आपको दवा, गोली कुछ चाहिए क्या? अंदर डाक्टर है, लेलो.’ आधीच्या दोन आश्रम असलेल्या गावांमध्ये मला हव्या असलेल्या गोळ्या मिळाल्या नव्हत्या त्या गोळ्या अकल्पित मला मिळाल्या. डॉक्टरांनी त्यांचे शुल्क, गोळ्यांचे मूल्य, काहीही आकारले नाही.

३)    मांडवगडावर बराच चढ आहे. चढून जायला चारपाच तास  लागतात. उतरायचा रस्ता म्हणजे पायवाट आहे आणि दगडगोट्यांनी युक्त तसेच बर्‍याच प्रमाणात सरळ उतरणीचा आहे, परिणामी वेग वाढतो आणि अर्ध्या पाऊण तासातच पायथा येतो. तिथून पुढे लक्कडकोट जंगलाचा रस्तादेखील दगडगोट्यांनी भरलेला आहे. या दोन मार्गांमध्ये कुठेतरी माझा घोटा दुखावला असावा. तेव्हा लक्षात आले नाही पण  पामाखेडी आश्रमातून पुढच्या आश्रमाकडे जात असता घोट्याच्या वेदनांमुळे चालण्याचा वेग मंदावला. आश्रमात पोहोचेपर्यंत पायाच्या घोट्याच्या आसपासचा भाग बर्‍यापैकी सुजला.  

परिक्रमेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांनी चलभाषच्या व्हॉट्सॲपवर एक समूह नर्मदा पायी परिक्रमाया नावाने बनवला होता. त्यावर आम्ही सर्व कुटुंबीय म्हणजे माझी पत्नी सौ. संघ्या, मुलगी डॉ. पल्लवी जोशी (फिजियोथेरपिस्ट), जावई, मुलगा श्रीहर्ष, सून सई, पुतण्या डॉ. सौरभ नित्य संपर्कात असायचो. पायाच्या सुजेविषयी मी समूहावर संदेश टाकल्यावर लगोलग सर्वांच्या सूचना आल्या.

दुसर्‍या दिवशी निघतांना बरोबरच्या मित्रांना सांगितले माझ्यामुळे काल तुमचा भरपूर वेळ गेला तेव्हा तुम्ही पुढे निघा. त्यांची तयारी नव्हती पण एकामुळे सहाजणांचा खोळंबा होणे योग्य नाही वगैरे समजावल्यावर ते निघाले. पुढच्या आश्रमात पोहोचल्यावर पल्लवीला पायाच्या सुजेचे फोटो पाठविले. तिच्या सूचनेनुसार स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरविले. सई, श्रीहर्षने त्या गावातले औषध दुकानाचे नाव व ठिकाणा याविषयी माहिती पाठवली. आश्रमात त्याप्रमाणे चौकशी करता दुकान व डॉक्टर दोन्ही आश्रमाच्या अगदी जवळच होते. आश्रमवाल्यांनी गाडीने नेण्याची आग्रहपूर्वक तयारी दाखविली पण परिक्रमा पायीच करावयाची असल्याचे सांगून नम्र नकार दिला. पल्लवीने क्रेप बॅण्डेज घ्यायचे सांगितले होते त्यानुसार औषधी दुकानातून क्रेप बॅण्डेज घेतले. किंमत ३०० रुपये पण दुकानदाराने पैसे घेतले नाहीत. नफा सोडून मूळ किंमत तरी घ्या असे सांगून देखील त्याने पैसे घेतले नाही. पल्लवीने क्रेप बॅण्डेज कसे बांधायचे याची ध्वनिचित्रफीत पाठविली होतीच. बॅण्डेज घेऊन डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून, मलम लावून बॅण्डेज बांधून दिले. गोळ्या दिल्या, मलमाची ट्यूब दिली. डॉक्टरांनी देखील शुल्क आकारले नाही. आश्रमात गेल्यावर दुपारचे जेवण झाल्यावर खरे तर पुढे कूच करायचे असते पण मला विश्रांतीची आवश्यकता होती म्हणून आश्रमाच्या महंतांना राहण्याविषयी विचारता ते म्हणाले, ‘महाराज, आप चाहे जितने दिन रहो. चातुर्मास मे रहो तो भी कोई दिक्कत नही.’ नंतर पल्लवीने घोट्याच्या आरोग्यासाठी कोणते व्यायाम व कसे करायचे याविषयी दृक् श्राव्य मार्गदर्शन दिले.  दुसर्‍या दिवशी सकाळी निघालो पण कमी चाललो. असे तीनचार दिवस झाले पण वेदनांमुळे आणि चालण्यामुळे परिक्रमा पूर्ण होण्याविषयी खात्री वाटेना. आमचा व्हॉट्सॲपवरील नर्मदा पायी परिक्रमाकौटुंबिक समूह कार्यशील होताच. सौरभने सांगितलेल्या आयुर्वेदीय संस्कारित तेलाने घोट्यावरच्या भागाची सूज उतरली. पल्लवीने अँकल कॅप विकत घ्यायला सांगितले पण दोनतीन गावांत मिळाली नाही. बुधनीसारख्या मोठ्या शहरात देखील मिळाली नाही म्हणून नर्मदा पायी परिक्रमासमूहावरील सर्वांनी मिळून पर्यायी योजना आखली. त्यानुसार पत्नीने वर रुजवातमध्ये उल्लेख केलेल्या सौ. वृषाली हळबे यांच्याशी संपर्क साधून सर्व घटनाक्रम विदीत केला व अँकल कॅप्स कुरीअरने पाठवायच्या आहेत त्या कोणत्या आश्रमात पाठवता येतील, त्याविषयी काय करता येईल अशी विचारणा केली. हळबे बाईंनी मी सध्या कोणत्या आश्रमात आहे हे विचारून घेतले. काही वेळानंतर हळबे बाईंनी सांगितले, अजून तीनचार दिवसांनी चौरास येथील आश्रमात पोहोचल्यावर तिथेच थांबायचे. आश्रमापासून चौरास गाव दोन किमीवर आहे. कुरीअरसाठी चौरास येथील श्री. पटेल यांचा पत्ता कुरीअरवाल्यांना द्यायचा. कुरीअर मिळाल्यावर श्री. पटेल ते आश्रमात पोहोचविण्याची व्यवस्था करतील. हळबे बाई, चौरास येथील श्री. पटेल यांच्याशी संपर्क व संवाद संध्याने साधला. पल्लवीने तीन अँकल कॅप्स कुरीअरने पाठवल्या. सई व श्रीहर्षने कुरीअरच्या विद्यमान स्थितीचा पाठपुरावा केला. कुरीअर ठराविक दिवशी पोहोचेल याची निश्चिती केली. सकाळी ११ वाजेपर्यंत चौरासच्या आश्रमात पोहोचलो होतो. त्याच दिवशी संध्याकाळी श्री. पटेल यांचा मुलगा करीअर आश्रमात घेऊन आला. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. क्रेप बॅण्डेज, तीन कॅप्स ह्या सर्व खूप उपयोगी ठरल्या. नंतर पल्लवीने चिकाटीने केलेला पाठपुरावा, सुचवलेले व्यायाम, दुखापत सुधारातील प्रगतीनुसार व्यायाम प्रकारात सुचवलेले बदल या सर्वांचा एकत्रित परिणाम पंधरावीस दिवसात चालण्याचा वेग पूर्ववत होण्यात झाला. परिक्रमेच्या पूर्ततेविषयी मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते ते टळले. सर्वांचे परस्परसामंजस्य, व प्रयत्न ह्यामुळेच हे शक्य झाले. माई नकारात्मकतेला वावच ठेवत नाही. सर्वदूर सकारात्मकतेने भरलेले, भारलेले वातावरण. संवाद घडवून आणणारी मैय्याच. मैय्या परिक्रमा पूर्ण  करवून घेतेच.

 

घाटाघाटावर भरणारे मेळे:

काही विशेष दिवशी मैय्याकिनारच्या गावांमध्ये किनार्‍यावरील घाटांवर मेळे भरतात. नर्मदाजयंती, महाशिवरात्री, संक्रांतिपर्व ह्या दिवशी मेळे भरतात. आसपासच्या गावांमधून सहकुटुंब लोकं येतात, नर्मदास्नान करतात, मैय्याची पूजाअर्चा करतात. किनार्‍यावरील वाळूत टमाटे, वांगी तिथेच भाजून भरीत तसेच डाळ आणि बट्ट्या बनवून खातात. विविध दुकाने थाटली जातात. भरपूर गर्दी असते. सर्वदूर उत्साहाचे टवातावरण असते.

                  

परिक्रमेत दिसलेले प्राणी:

परिक्रमेत काही प्राण्यांचे दर्शन झाले. एका ठिकाणी भल्या पहाटे कोल्ह्यांचे दर्शन  झाले. काही गावांमध्ये रात्रभर कोल्हेकुई ऐकायला मिळाली. ऊस जिथे जास्त अशा भागातच कोल्हे आढळले. साप, मुंगूस, मोर काही ठिकाणी दिसले. आपल्याकडे दुर्मिळ असणारे मोर कुटुंब पाहायला मिळाले. मोर, लांडोर व दोन छोटी पिले रस्ता ओलांडत होती. माकडं बर्‍याच ठिकाणी होती. एका शेतात दोन हरीण दिसले. आमची चाहूल लागताच लंब्याचवड्या उड्या मारीत काही सेकंदात तीनचार शेतं पार करीत नजरेआड झाले. काही पावलं चालण्याच्या अवधीत त्यांनी जे अंतर पार केलं त्यामुळे त्या परिस्थितीत त्यांचा हेवाच वाटला. काही वेळा गावांमधून जात असतांना वाढलेली दाढी, मळलेले परिधान पाहून काढायचा तो निष्कर्ष बरोबर काढून कुत्री आमच्यावर आवेशाने भुंकायची पण हातातले दंड पाहून हल्ला करायला धजावत नसत.

परिक्रमेची सांगता:

सव्वातीन महिन्यात पुन्हा ओंकारेश्वरला पोहोचल्यावर (दि.२७ फेब्रुवारी) परिक्रमा पूर्ण झाली. मधल्या काळात संपर्कात राहून, पोहोचण्याचा अंदाज घेत संध्याही (माझी पत्नी) ओंकारेश्वरला दुसर्‍या दिवशी पोहोचली. त्यानंतरच्या दिवशी गुरुजींच्या कथनानुसार सपत्नीक संकल्पसांगता पूजा केली. नंतर ओंकारेश्वर मंदिरात घाटाघाटावर पूजा केलेले बाटलीतले थोडे नर्मदाजल ओंकारेश्वराला वाहिले. नंतर ओंकारेश्वर मंदिर ज्या पर्वताच्या पायथ्याशी आहे त्या मांधाता पर्वताची प्ररिक्रमा (अंतर साडेसात किमी) केली. येथील मार्गात एका ठिकाणी आद्य शंकराचार्यांचे भव्य मंदिर निर्माणाधीन आहे. त्यासाठी जागेचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे व निर्माण कार्याला सुरुवात झाली आहे. ह्या परिक्रमेत चारपाच पुरातन मंदिरे लागतात. तेथेही नर्मदाजल वाहिले. मांधाता पर्वत परिक्रमेनंतर थोडे पुढे नर्मदा व कावेरी यांच्या संगमापाशी हरभर्‍याची डाळ संगमाच्या पाण्यात भिजवून घेतली.  डाळ तिथे विकत मिळते. ही भिजवलेली डाळ जवळच असलेल्या ऋणमुक्तेश्वर मंदिरात महादेवाला वाहिली. थोडे नर्मदाजल वाहिले. नमस्कार केला. नर्मदा परिक्रमेदरम्यान अनेक लोकं आपल्याला विविध प्रकारे मदत करतात, आपल्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय करतात. मार्गदर्शन करतात ह्या सर्वांचे आपण ऋणाईत होतो. त्या ऋणातून मुक्ती देणारा तो ऋणमुक्तेश्वर. म्हणून शेवटी कृतज्ञतापूर्वक ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घ्यायचे. दुसर्‍या तीरावर असलेल्या ममलेश्वर मंदिरात ममलेश्वराला शिल्लक असलेले सर्व नर्मदाजल वाहिले. नमस्कार केला. नर्मदा ही शंकराची मुलगी. म्हणून घाटाघाटावर महादेवाचे मंदिर हे असतेच असते.

माझे नातेवाईक श्री. अभय लोणकर यांच्या सूचनेवरून तसेच पाठपुराव्यामुळे सदर लेखनकामाठी झाली, त्यांचे आभार.

ऋणांचे कधीही न उतरणारे ओझे घेऊन कृतज्ञभावाने ओंकारेश्वर सोडले पण अनेकांकडून बरेच काही शिकून, वेगवेगळ्या अनुभवांनी श्रीमंत होऊन. एकूणच स्वत:च्या क्षुद्रपणाची जाणीव ठळक होत असतांना विंदांच्या अर्थपूर्ण ओळींची आठवण अपरिहार्यपणे झाली.

देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. ।।

लेखनसीमा.

।।नर्मदे हर।।

ऋणाईत:

श्रीकांत रोहिणीकान्त माळी.


powered by social2s