आम्ही लग्न झाल्यावर वर्षातच स्वतःच्या बंगल्यात पांचपाखाडी येथे रहायला आलो. बंगल्याच्या बाजूला भरपूर मोकळी जागा असल्यामुळे तेथे बाग तयार केली. सर्व प्रकारची फुले, फळे लावली. जमतील तशा भाज्याही लावल्या. नारळाची झाडेही लावली. आवडीने गार्डनिंग केले. देवाने भरभरून सगळं दिले. सोसायटीत सगळयांना देण्यात खूप आनंद होता.मला वाटतं यातूनच समाजासाठी काहीतरी करायची उर्मी उत्त्पन्न झाली. पांचपाखाडीत CPL संस्था स्थापन केली. म्हणजे चंदनवाडी पांचपाखाडी लुईसवाडी ह्या संस्थेत बरेच उपक्रम केले. प्राथमिक आरोग्य केंद्र चालू केले. मुलांना पोलिओ ट्रिपल यांचे लसीकरण केले. नितीन कंपनी ते स्टेशन TMT चालू केली.         

राममारुती रोडवर फिरत असतांना दिवाळीमध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रांगोळी प्रदर्शन भरले होते. ते पाहायला गेलो. तेथे वनवासी कल्याण आश्रम ह्या संस्थेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख झाली. सगळे तरुण, हौशी, उत्साही होते. सहज मनात विचार आला. ह्यांच्या बरोबर काम करूया. सोमवारच्या मिटिंग्जना जाऊ लागले. जव्हार येथील चालतवाड आणि मोखाडा येथील बेरिस्ता या गावातील आश्रम शाळांना भेटी  दिल्या. येथे राहणाऱ्या आदिवासी मुलांचा सगळा खर्च - अन्नधान्य ठाणेहून गोळा करून तिथे पाठवू लागलो. मी ठाणे शहर महिला प्रमुख म्हणून काम करू लागले.

लिलाताई जोशी यांच्या सखी शेजारिणी मंडळात जायला सुरुवात केली. नौकरी करणाऱ्या महिलांसाठी "मिळवती" हा ग्रुप तयार करून त्यांना ऑफिसमध्ये पोहोचल्या नंतर गरमागरम नाश्ता नेऊन द्यायला सुरुवात केली. बऱ्याचवेळा जेवणाच्याही ऑर्डर्स घेतल्यामाझ्या मैत्रिणींनी मला संस्कार भारती ह्या अखिल भारतीय संस्थेमध्ये नेले. सामाजिक सांस्कृतिक उपक्रम करणारी संस्था आहे. काही दिवसातच माझी सेक्रेटरी (ठाणे शहर) ह्या पदावर नेमणूक केली. वर्षाचे कार्यक्रम - रांगोळी शिकवायची शिबिरे सुरु झाली. बरेच सभासद बनवले.

प्रसिद्ध लेखक-कवी-प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्याबरोबर "पसायदान" ही संस्था स्थापन केली. ज्ञानसाधना विद्यालयात "सामान्यातले असामान्य" यांच्या मुलाखती मुलांसाठी घेतल्या. तन्वी सत्व प्रकल्पाच्या डॉ. मेधा मेहेंदळे यांच्या बरोबर आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. वेगवेगळ्या    पॅथीजच्या डॉक्टरांना एका स्टेजवर आणून त्यांची लेक्चर्स घेतली"प्रेरणा प्रतिष्ठान" या सामाजिक सांस्कृतिक संस्थेत प्रथम सल्लागार नंतर उपाध्यक्ष म्हणून काम केले. "मुखी नाम हाती टाळ" हा कार्यक्रम एकादशीच्या निमित्ताने गडकरी रंगायतन येथे केला. सारेगम फेम अभिजित कोसंबी त्याचा भाऊ प्रथमजीत कोसंबी विनायक जोशी हे गायक निवेदन धनश्री लेले ह्या मंडळीनी सादर केला. बरीचशी जबाबदारी माझ्यावर होती. कार्यक्रम खूप छान झाला. गडकरीन रंगायतनमध्ये बसायला जागा कमी पडली. मधल्या पॅसेजमध्येही श्रोते बसले होते. प्रेरणाच्या इतरही भरपूर ऍक्टिव्हिटी चालतात.

BPT (बॉम्बेपोर्ट ट्रस्टची) नौकरी सोडल्यानंतर TJSB बँकेमध्ये मला बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून घेतले. टर्म काम केलेह्याच दरम्यान आम्ही पांचपाखाडीतुन घोडबंदरला वाघबीळ परिसरात जागा घेतली. नवीन एरिया ओळखी नव्हत्या. पण एक दिवस "घोडबंदर रोड हौसिंग सोसायटी असोसिएशनचे अध्यक्ष माझ्या घरी एका कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन आले. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. या कार्यक्रमानंतर बऱ्याच जणांशी ओळखी झाल्या. मला या संस्थेत प्रथम सल्लागार नंतर खजिनदार म्हणून घेतले. सोसायटयांच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न केला. बरेच कार्यक्रम केले. सावरकर व्यख्यानमाला सुरु झाली. अत्रे कट्टा सुरु झाला साहित्य कला रसिक मंच हे व्यासपीठ वाघबीळ भागात रहाणाऱ्या कलाकारांसाठी सुरु केले. उत्तरायण ज्येष्ठ नागरिक संघात मेंबर झालो. लगेचच दिवाळी पहाट हा कार्यक्रम घोडबंदर परिसरात सर्वात प्रथम आयोजित केला. आज अध्यक्ष या पदावर काम करते.

विरंगुळा महिला मंडळामध्ये "महिलांसाठी आयुर्वेद" ह्या विषयावर व्याख्यान दिले. ठाण्यात राहणारे डॉ. दीक्षित आयुर्वेद तज्ञ पोतदार कॉलेजमध्ये शिकवणारे आमचे गुरु यांच्याकडे - वर्ष रोज शिकायला जात होतो. त्यांनी आम्हाला तयार केले. आणि तुम्ही गृहिणींना तयार करा असे सांगितले होते. नंतर मी विरंगुळाची मेंबर झाले. कमिटीत जाऊन अनेक उत्तम कार्यक्रमांचे आयोजन केले. आता ह्या भागामध्ये भरपूर मित्र मैत्रिणी आहेतह्या सामाजिक कार्याव्यतिरिक्त भरपूर लेखन केले. मासिके, वर्तमानपत्रे रेडिओ यात लेख पाठवले. अध्यात्मिक विषयाशी संबंधित परीक्षा दिल्या. भरपूर वाचन, लेखन मनन केले. दोन e.book लिहिली ) e.book मोरया ) महाकैवल्यतेजा वेगवेगळ्या विषयांवर व्यख्याने दिली. वेगवेगळ्या संस्थांमधून पुरस्कार -ट्रॉफिझ मिळाल्या. निबंध स्पर्धेमधे भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे बक्षिसही मिळवले.

आज मी तृप्त आहे. सामाजिक उपक्रम भाग घ्यायला आजही मला आवडते. माझ्या लेखनाबद्दल; दिलेल्या परीक्षांबद्दल पुन्हा कधीतरी.

 

वैशाली कुलकर्णी

(वय ७८ पूर्ण)


powered by social2s