Excelsheet te Gpay cha smart pravas

Excelsheet te Gpay cha smart pravas

एक्सेल शीट' ते 'जी-पे'चा स्मार्ट प्रवास!

M.A. Topper in  Bombay university,B Ed  language  teacher
State level Resource Person for high school  &Jr  college   Engish teachers.
Ex president, Jyeshth Nagrik sangh Madhyvarti samiti Thane

शिकण्याचा एक जुना अनुभव मला सेवानिवृत्त होऊन जवळजवळ वीस वर्ष होतील. मी माध्यमिक शाळेत शिक्षिका होते आणि सेवाकाळात शेवटच्या वर्षांत संस्थेनं ठरवलं, की सर्व परीक्षांचे निकाल संगणकावर 'एक्सेल शिट'मध्ये तयार करायचे. आता आली का पंचाईत! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शिक्षिकेला हे कसं शक्य होणार, असं वाटलं. दोन-चार शिक्षक सोडले तर कुणालाच संगणकाची ओळख नव्हती.

 

 यावर तोडगा म्हणून सर्व शिक्षकांना संगणकाचं प्रशिक्षण द्यायचं ठरलं. शाळा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आम्ही संगणकाशी झटापट करायचो. विज्ञान शिक्षिका आम्हाला शिकवायच्या. तांत्रिक माहिती समजली, परभाषिक शब्दांनी आमच्या शब्दकोशात भर घातली. पण प्रत्यक्षात मूषकराजावर नियंत्रण ठेवणं अवघड आहे हेही कळलं. हा माऊस दुणकन उडी मारून स्क्रीनवर मुक्त संचार करायचा आणि त्यापेक्षा हातानं काम केलेल परवडलं असं वाटायचं. सराव करायला तेव्हा घरी संगणक नव्हता. मी चुकतमाकत थोडंफार शिकले, पण परीक्षेचा निकाल तयार करताना मात्र तरुण शिक्षिकेकडून तो करून घ्यायचे. आपल्याला एक्सेल शिटमध्ये प्रावीण्य मिळवता आलं नाही याची टोचणी मात्र माझ्या मनाला लागून राहिली....

 

 पुढे जेव्हा माझा मुलगा अमेरिकेला शिफ्ट झाला, तेव्हा त्यानं त्याचा संगणक आमच्याकडे आणून टाकला. आता संगणकाचं 'बेसिक' तंत्र शिकून घ्यायचं ठरवलं. माझ्याकडे काही मुली इंग्लिश शिकायला येत होत्या, त्यांपैकी एकीला संगणकाचं ज्ञान चांगलं होतं. तिनं माझ्याकडून शिकवणीचे पैसे घ्यायचे आणि सुट्टीच्या दिवशी मला संगणकाचं शिक्षण द्यायचं असं ठरवलं. ती आठवड्यातून एकदा शिकवून जायची, पण सराव करताना रोज नवी अडचण समोर यायची. मग त्यावरही मार्ग होता. आम्ही तळमजल्यावर राहतो, त्यामुळे खाली खेळणाऱ्या मुलांपैकी कुणाला तरी बोलावून मी मदत घ्यायचे. नवं तंत्रज्ञान मुलांना आपल्यापेक्षा जास्त येतं, हे मान्य केलं की कुणाकडूनही शिकून घेण्याची लाज वाटत नाही. उलट या मुलांना मजाच वाटायची मला मदत करताना. आता संगणकाशी कामापुरती ओळख झाली आणि मला गड सर केल्यासारखं वाटलं. याचा उपयोग मी चांगला करून घेतला.

 बारा वर्षांपूर्वी मी ठाण्यात 'ओंकार ज्येष्ठ नागरिक संघा'ची स्थापना केली. संघाचं आणि सर्व सभासदांचं रेकॉर्ड मी एक्सेल शिटमध्ये 'सेव्ह केलं, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीची अध्यक्ष असताना शासनाशी, महापालिकेशी पत्रव्यवहार करताना संगणकाचा खूप उपयोग झाला. पण इतके पुरेसं नव्हतं. मोबाइल फोन वापरायला शिकलोच, पण संगणक थोडाफार शिकत नाही तोच स्मार्टफोन आला. आता 'मी व्हॉट्स अपवर नाही' असं सांगणं कमीपणाचं होतं ना! मग तो प्रयत्न केला. आता कमी त्रास झाला, पण स्मार्टफोन रोजच काही तरी तरी 'नवी 'फीचर्स' घेऊन येतो आणि आम्हाला नवी परीक्षा द्यावी लागते.

 

  मोबाइल फोननं फोटो काढणं, व्हिडीओ करणं किती सोपं झालंय. फोटो एडिट करायला, 'क्रॉप' करायला शिकले, पण या फोटोंच कोलाज कसं करायचं ते अजून शिकता आलं नाही. मोबाइलवरून व्हिडीओ कॉल करणं हे ज्येष्ठांना वरदानच झालं आहे. लांब राहणाऱ्या मुलांशी सहज संवाद साधता येतो.

   'मी 'करोना' चे एक प्रकारे आभारच मानीन, 'झूम  मीटिंग' हा शब्दही मी कधी ऐकला नव्हता आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक चक्क झुम मीटिंग्ज घ्यायला लागलो. 'फेस्कॉम' ही आमची राज्यस्तरीय संघटना झूमवर मीटिंग्ज घेऊ लागली आणि आम्ही ते शिकलो. ठाण्यातल्या ज्येष्ठांसाठी आमच्या एका सभासदाच्या सौजन्यानं दोन दिवसांचं एक प्रशिक्षण दिलं. ज्येष्ठांसाठी ऑनलाइन योगाभ्यास वर्ग घेतले आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही ठेवले. हे करताना खूप 'थ्रिल' वाटत होतं. मनात म्हणायचे, 'मुलांनो, तुम्ही 'वर्क फ्रॉम होम' करत असाल, तर हम भी किसी से कम नहीं!' ऑनलाइन पेमेंट करायला शिकले. मुलगा काही दिवसांसाठी आला तेव्हा त्याच्याकडून 'जी पे' शिकून घेतलं. बँकेचं अॅप डाऊनलोड केलं. घरबसल्या पैसे ट्रान्सफर करण्याचा फायदा समजला. वेळ वाचला आणि त्रास वाचला. पण कितीही शिकायचा प्रयत्न केला तरी नवीन काही तरी तंत्रज्ञान बाहेर पडतं आणि आमच्यापुढे पुन्हा मोठी आव्हान उभी राहतात. अजून किती शिकावं लागेल कळत नाही. पण पूर्वी कधी 'लँडलाइन' सुद्धा हाती न धरलेले आम्ही आता स्मार्टफोनमुळे थोडे स्मार्ट झालो !

Enquire