Narmada Payi Parikrama
21-10-24
नर्मदा पायी परिक्रमा
रुजवात:
चार वर्षांपूर्वी ‘नर्मदा परिक्रमा’ यात्रा आयोजकांतर्फे सपत्नीक केली होती. त्यावेळी गरुडेश्वरला एक पायी परिक्रमावासी (नाशिकचे श्री. कुलकर्णी) भेटले होते. त्यांच्याशी झालेल्या संवादातून पायी परिक्रमेविषयी थोडीफार माहिती मिळाली. त्यांची ती दुसरी परिक्रमा होती. त्यामुळे आपणही अशी पायी परिक्रमा एकदा तरी करावी असा विचार डोक्यात रुजला. प्रत्यक्षात २०२२ च्या नोव्हेम्बर महिन्यात त्याला मूर्त स्वरूप आले.
मागील वर्षी म्हणजे २०२२ साली पायी नर्मदा परिक्रमा करणार्यांसाठी पुण्याच्या तिघांनी ‘नर्मदा पायी परिक्रमा २०२२-२३’ ह्या नावाने व्हॉट्सअॲपवर एक समूह स्थापन केला. त्यांची नावे अशी-
- डॉ. श्री. मिलिंद शिरगोपीकर (९४२२९८७६५६)
- सौ. वृषाली हळबे (७५८८२८४६२६)
- श्री. धनंजय नाईक (९९२२४४३८७८)
परिक्रमेचा रीतसर कालावधी संपल्यावर हा समूह बंद करण्याविषयी निवेदन श्री. धनंजय नाईक यांनी समूहावर टाकले. परंतु हा समूह एवढा लोकप्रिय झाला की तो बंद करू नये जनमत पडले. भावी परिक्रमावासीयांसाठी तो मार्गदर्शक ठरू शकतो असे अनेकांनी प्रतिपादन केले. समूह प्रशासकांनीही मोठ्या मनाने विनंतीचा मान राखत समूह बंद केला नाही. सदर समूहाचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी उपरोल्लेखीत त्रयीपैकी कोणाशीही संपर्क साधावा. पायी नर्मदा परिक्रमा करू इच्छिणार्यांना परस्परसंवादातून, परिक्रमा पूर्ण केलेल्या लोकांच्या अनुभवातून बोध घेता यईल. हा एक स्तुत्य, उपयुक्त सामाजिक उपक्रम आहे.
नर्मदा पायी परिक्रमा २०२२-२३.
तयारी:
दि. २० नोव्हेम्बर २०२२ ला ओंकारेश्वर येथील श्री. गजानन महाराज आश्रमात पोहोचलो. आधारपत्र दाखवून मठात परिक्रमेसाठी पंजीकरण केले. खांद्यावरून पाठीवर घेण्याची पिशवी, श्वेत वस्त्रप्रावरणे, कमंडलू (पाण्याची बाटली), झोपण्यासाठी उष्णतारोधक पॉलीयुरेथेन फोमची वजनाला हलकी गुंडाळी तसेच इतर आवश्यक वस्तू घेतल्या होत्याच. एक दंड विकत घेतला, मैय्याची प्रतिमा घेतली. भ्रमणध्वनीवर असणारे माहितीपुस्तिकावजा तक्ते, ज्यामध्ये परिक्रमेदरम्यान लागणारी गावे, अंतर, आश्रमांची नावे, स्थानमाहात्म्य, रस्ता (सडक, पाऊलवाट, जंगलमार्ग) आदी तपशील होता, त्याच्या प्रती काढून घेतल्या. क्षौर केले. दुसर्या दिवशी म्हणजे दि. २१ नोव्हेम्बरला नर्मदास्नान आटोपून, ओंकारेश्वर तसेच ममलेश्वर दर्शन घेऊन मैय्येच्या तीरावर गुरुजींच्या निर्देशानुसार एका लहान बाटलीत नर्मदेचे जल भरून घेतले. हे नर्मदाजल, दंड व मैय्याच्या प्रतिमेची पूजाअर्चा केली. नर्मदा आरती केली, नर्मदाष्टक पठण करून पायी नर्मदा परिक्रमेचा संकल्प सोडला आणि किनारामार्गे परिक्रमेला सुरुवात केली.
परिक्रमेचा आरंभ:
परिक्रमा म्हणजे मंदिरात घातली जाते तशीच, मैय्याला उजवीकडे ठेवून घातलेली प्रदक्षिणा. ही सहसा नर्मदेचे उगमस्थान असलेले अमरकंटक किंवा ओंकारेश्वर येथून सुरू करून त्या त्या ठिकाणी पुन्हा येत पूर्ण करायची असते. अंतर ३००० ते ३२०० किमी. संकल्प सोडतांना आम्ही तिघेजण होतो. एकजण सडकमार्गाने निघाला. आम्ही दोघे किनारामार्गे निघालो. किनारामार्ग बर्याचदा निर्जन असला तरी साथीला खंड्या, सुतारपक्षी, टिटव्या, विविध बगळे व इतर वेगवेगळे पक्षी, त्यांचे कूजन, झाडंझुडुपं होती, त्यामुळे नितांतरमणीय निसर्गसमृद्धी अनुभवायला मिळाली. मैय्याच्या किनार्याचा रस्ता म्हणजे चढउताराची, काही ठिकाणी अरुंद पायसगर. कुठे खडकातून, कुठे नाल्यातून, कुठे हिरव्यागार शेतातून, कुठे पर्वतराजीतून, कुठे चिखलातून, कुठे वाळुतून, कुठे दगडगोट्यातून, वेगवेगळ्या रुपातील पाऊलवाट. परिक्रमा करतांना कोठेही नर्मदा ओलांडायची नाही हा परिक्रमेचा नियम आहे. भल्या पहाटे उठून प्रातर्विधी आटोपून दंड, बरोबर बाटलीत भरून घेतलेले नर्मदाजल व नर्मदा प्रतिमा यांचे पूजन करून नर्मदेची आरती व नर्मदाष्टक पठण करून सूर्योदयाच्या वेळी चालायला सुरुवात करायची. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आश्रमात जेवणासाठी थांबायचे पुन्हा चालायला प्रारंभ करून सूर्यास्ताचा अंदाज घेऊन आश्रमात संध्याकाळचा पूजापाठ, भोजन व मुक्कामासाठी थांबायचे असा दिनक्रम असायचा. सरदार सरोवरामुळे किनार्याचा रस्ता काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याखाली आला आहे. पर्यायी, सडकमार्गाचा अवलंब करावा लागतो.
आश्रम